जन जागृती शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी

स्थापना : 20 जानेवारी 1991

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित संस्था

20 जानेवारी 1991 रोजी स्थापन झालेली आमची संस्था समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, पुनर्वसन व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत आहे. स्थापनेपासूनच संस्थेने सेवाभावी दृष्टिकोन स्वीकारून दिव्यांग मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सुरक्षित व शिस्तबद्ध निवासी सुविधा, दर्जेदार व विशेष शिक्षण, तसेच त्यांच्या शारीरिक, बौद्धिक व सामाजिक विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. शिक्षणासोबतच जीवनावश्यक कौशल्ये, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो.

प्रत्येक विद्यार्थी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण व स्वावलंबी नागरिक व्हावा हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने संस्था प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करत आहे.

संस्थेअंतर्गत खालील 03 निवासी दिव्यांग विद्यार्थी शाळा चालविल्या जातात

संस्थापक अध्यक्ष परिचय

जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी चे संस्थापक अध्यक्ष श्री. नागनाथ गंगाय्या आरळकर यांचा जन्म ०५ जानेवारी १९४४ रोजी परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. दारिद्र्य असूनही त्यांनी भिक्षा मागून शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने उच्च शिक्षण घेत बी.ए., बी.एड., एम.एड. पदव्या संपादन केल्या.

ते जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते व नोकरी करत असतानाच अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. शिक्षक संघटनेत सक्रिय राहून त्यांनी शिक्षकांच्या समस्या मांडल्या तसेच गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून अनेकांना घराचे स्वप्न पूर्ण करून दिले.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी त्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था उभारल्या. समाजसेवेला अधिक वेळ देता यावा म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून २० जानेवारी १९९१ रोजी जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी ची स्थापना करून वसमत येथे मुकबधिर, मतिमंद व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू केल्या

छायाचित्रे

Scroll to Top